गीता महाशब्दे, विवेक मॉंटेरो
‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ म्हणजे काय, तो पाश्चिमात्य आहे का, त्यासाठी नास्तिक असावं लागतं का, माझ्या देवाधर्मावरील श्रद्धेच्या हे विरोधात असणार का, असे अनेक प्रश्न याबाबत विचारले जातात.
धार्मिक असूनही धर्मनिरपेक्ष असणं शक्य असतं; तसंच श्रद्धा असूनही वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणणं शक्य असतं! काही वैयक्तिक श्रद्धा आपल्याला तपासाव्याशा वाटत नाहीत. जोवर आपण त्या वैज्ञानिक असल्याचा दावा करत नाही, त्या वैयक्तिक पातळीवर ठेवतो, सामाजिक जीवनातील निर्णयांवर त्यांचा परिणाम होऊ देत नाही; तोवर त्या तपासायच्या की नाही हा व्यक्तिगत निर्णय असतो. श्रद्धा ठेवणे किंवा न ठेवणे हे दोन्हीही आपले घटनात्मक अधिकार आहेत. मात्र, कोणतेही विधान किंवा विश्वास वैज्ञानिक असल्याचा दावा केला जात असेल, तर मात्र विज्ञानाच्या कसोटीवर ते तपासण्याची आपली तयारी असायला हवी.
विज्ञान म्हणजे केवळ एक विषय नसून ती एक विचारपद्धती आहे. पुरावा तपासण्यावर आधारलेली त्याची एक प्रक्रिया असते. डॉ. दाभोलकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची चार शब्दांत केलेली व्याख्या आहे – ‘जेवढा पुरावा, तेवढा विश्वास’! ते म्हणतात, ‘वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारणभाव. प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं, ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं, जगातल्या सगळ्याच कार्यांच्या मागची कारणं समजतातच असं नाही; पण ती ज्या वेळी समजतील, त्या वेळी ती कशी समजतील हे कार्यकारणभावामुळे मला समजतं. यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला लाभलेला हा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे.’ लोकवैज्ञानिक विचारवंत हेमू अधिकारी म्हणतात, ‘वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे निसर्गविज्ञानापासून राजकारण, अर्थकारण, नीतीशास्त्रापर्यंत सर्व बाबींकडे तर्कशुद्ध पद्धतीने विज्ञानाची पद्धत वापरून बघणं. अशा पद्धतीने पाहिलं, तर प्रश्नांची सोडवणूक वेगळ्या प्रकारे करता येते.’
भारतीय समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन व चिकित्सक विचारांची मोठी परंपरा आहे – चार्वाकांपासून, गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंत. ‘तपासा आणि विवेकाला पटले तरच स्वीकारा’, असा विचार त्यांनी दिलेला आहे. पंडित नेहरूंनी म्हटले आहे, ‘वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया, कृती करण्याची पद्धत, सत्याचा शोध, जगण्याची पद्धत आणि मुक्त मानवाची मनोवृत्ती’. शहीद भगतसिंगांनीही विवेकाने तपासून स्वीकारण्याचा विचार ठामपणे मांडलेला आहे.
विज्ञानाच्या कसोटीवर तावूनसुलाखून घेतलेल्याच गोष्टी स्वीकारायच्या असं एकदा ठरवलं, की वस्तुनिष्ठता, तर्कशक्ती, विवेक, तारतम्य, सच्चेपणा, जबाबदारी घेणं, धिटाई, मानवता, लोकशाही, स्वातंत्र्य, कोणतेच भेदभाव न मानणं, धर्मनिरपेक्षता ही मूल्यं आपसूकच येतात. वैज्ञानिक दृष्टिकोन नेहमी प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन देतो. म्हणूनच तो मूलतत्त्ववादाच्या आणि धर्मांधतेच्या विरोधात असतो.
पाच वर्षांपूर्वी, देशभरातले काही वैज्ञानिक आणि लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते बेंगळुरूमध्ये एका कार्यशाळेसाठी जमले होते. तेव्हाच डॉ. दाभोलकरांच्या हत्येची बातमी येऊन थडकली. तातडीने एकत्र जमून त्यांनी एक ठराव पारित केला. धर्मांध दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड खुनाचा तीव्र निषेध करून डॉ. दाभोलकरांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन त्यांचे कार्य आणि ध्येय पुढे नेण्याची प्रतिज्ञा केली. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना, दिशाभूलीला आणि धर्मांध दहशतवादाला विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे; भारतीय राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता, समानता आणि लोकशाही ही मूल्ये भारतातील प्रत्येक शाळेपर्यंत आणि गावागावापर्यंत नेणे, असा निर्धार यांनी केला. ‘गांधीजींची हत्या करून त्यांचा संदेश आणि मूल्ये जशी थांबवता आली नाहीत, तसेच डॉ. दाभोलकरांची मूल्ये आणि विचार या भ्याड खुनामुळे थांबवता येणार नाहीत’, असा इशारा त्यांनी समाजविरोधी शक्तींना दिला. त्याचबरोबर अधिक जोमाने, व्यापक स्तरावर लोकांमध्ये विज्ञानाचा आणि वैज्ञानिक विचारपद्धतीचा प्रसार करून धर्मांध दहशतवादाविरूद्धची ही विचारांची लढाई जिंकण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचे माजी संचालक प्रा. नरेश दधीच यांनी तयार केलेल्या निवेदनास प्रा. जयंत नारळीकर, प्रा. अशोक सेन, प्रा. स्पेंटा वाडिया, प्रा. गोपाकुमार आणि इतर अनेक दिग्गज वैज्ञानिक, तसेच अनेक शिक्षणतज्ज्ञ व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस साजरा करण्याच्या दृष्टीने विचारा ‘का?’, #पूछोक्यों ही मोहीम आखली आहे. हा दिवस देशाच्या सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निश्चित साजरा होईल, याची हा लेख लिहीत असताना खात्री आहे.
आज आपल्या देशात लोकशाहीवर होत असलेले हल्ले पाहता, लोकशाही मजबूत करण्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचे काम नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल. विज्ञानविरोधी भूमिका, छद्मविज्ञान आणि लोकशाहीवरील हल्ले यांचा जवळचा संबंध आहे. केवळ आपल्या देशातच नाही, तर टर्की, सौदी अरेबिया आणि अगदी अमेरिकेतसुद्धा, उजव्या विचारसरणीचे राजकारणी नेते उत्क्रांतीसारख्या महत्त्वाच्या वैज्ञानिक सिद्धांतांवर हल्ले चढवत आहेत. पुराणकथांना विज्ञान म्हणून बढावा देण्याचा प्रयत्न त्रिपुरा व गुजरातचे मुख्यमंत्री, मानवसंसाधन व विज्ञानतंत्रज्ञान मंत्री आणि खुद्द पंतप्रधानही करत आहेत. काही राज्यांमधील पाठ्यपुस्तकांमध्ये अनेक चित्रविचित्र अवैज्ञानिक गोष्टी अभ्यासक्रमात घुसडल्या जात आहेत. या गोष्टींना प्रश्न विचारून, तपासून, त्यांची शहानिशा करण्याची क्षमता निर्माण करणारे पद्धतशीर शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे. विज्ञान हे प्रश्न विचारण्यावर, शंकेखोरपणावर आधारलेले असल्यामुळे त्याला लोकशाहीची गरज असते. लोकशाहीसाठीही प्रश्न विचारणे आवश्यक असते. ‘विचारा – का?’ ही घोषणा सामान्य लोकांमधील चिकित्सक विचाराला प्रोत्साहन देईल आणि म्हणून लोकशाही बळकट करण्याला मदत करेल. द्वेषाच्या राजकारणाचे पुरस्कर्ते लोक दहशत निर्माण करून लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन मात्र लोकशाहीतील खुल्या वातावरणाला आणि लोकांच्या मुक्त अभिव्यक्तीला मदत करेल.
महत्त्वाचे पाऊल
राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणजे धर्मांध दहशतवादाविरूद्धची ही विचारांची लढाई जिंकण्याचा निर्धार प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कच्या १५व्या कॉंग्रेसमध्ये, दरवर्षी २० ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर संयुक्तपणे ही हाक देण्यात आली. कामगार, शेतकरी, शिक्षक, महिला, विज्ञानक्षेत्रातील अनेक संस्था-संघटनांनी आणि व्यक्तींनी त्याला पाठिंबा दिला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, चिकित्सक बुद्धी आणि सुधारणावाद या भारतीय राज्यघटनेने आपल्याला घालून दिलेल्या मूलभूत कर्तव्यांच्या कठोर आणि जोरकस अंमलबजावणीचा हा भाग आहे. वैज्ञानिकता, विवेक आणि लोकशाहीच्या मार्गाने जाणाऱ्या, विविधतेचा आदर करणाऱ्या भारतीय जनसमुदायांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे.
..
वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञांचे निवेदन पुढील लिंकवर वाचा आणि त्याला पाठिंबा द्या.
https://navnirmitilearning.org/scientific-temper
# विचारा, ‘का?’ या मोहिमेसाठी दाभोलकरांच्या भाषणांचे व्हिडीओज, विज्ञानाची पद्धत शिकण्यासाठीची प्रयोगांची पुस्तिका, छद्मविज्ञानाबाबतचे सविस्तर प्रेझेंटेशन, पोस्टर्स असे साहित्य अनेक भाषांमध्ये बनवलेले आहे (www.aipsn.in)
गौतम बुद्धांचे विचार
– केवळ ऐकलं आहे म्हणून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका.
– बहुतांश लोक असं म्हणतात म्हणूनही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.
– आपले आदरणीय गुरू म्हणतात म्हणूनही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.
– वर्षानुवर्षांची परंपरा आहे म्हणूनही कशावर विश्वास ठेवू नका.
– परीक्षण आणि विश्लेषण करून जर तुम्हाला असं दिसलं, की ती गोष्ट तर्कविचारावर खरी आहे आणि सर्वांच्या हिताची आहे; तर तुम्ही ती गोष्ट माना आणि त्यानुसार आचरण करा.
स्वामी विवेकानंद म्हणतात
– ज्योतिष किंवा त्यासारख्या गूढ गोष्टी कमकुवत बुद्धीचं लक्षण आहे. आपल्या बुद्धीला त्या विळखा घालू लागल्या तर लगेच आपण डॉक्टरला दाखवावे, चांगले जेवण घ्यावे आणि आराम करावा.
– अंधविश्वास हा आपला फार मोठा शत्रू आहे. धोकेबाजी हा तर त्याहून मोठा. अंधविश्वासाने डोक्यात प्रवेश केला, की बुद्धी निघून जाते.
– डोळे झाकून विश्वास ठेवणे म्हणजे मानवी आत्म्याचे विघटन होणे. तुम्ही नास्तिक झालात तरी चालेल, पण प्रश्न न विचारता कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका.
Join Over 10,000 Students, Teachers & Parents Enjoying Maths
Become Part of NLF family.
Get Social