We need Scientific Temper to fight Covid. Oppose promotion of Astrology by Governmental efforts.
To read the English note and to endorse the campaign click here.
कोरोनाचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. फलज्योतिषाचा प्रसार करण्याच्या सरकारी प्रयत्नांचा प्रतिकार करा.
या मोहीमेला पाठिंबा देण्यासाठी येथे क्लिक करा.
मराठी निवेदन
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष विषयात एम. ए. चा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या IGNOU च्या घोषणेबाबत आम्ही, ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क (AIPSN) आणि सर्व संलग्न संस्था-संघटना, चिंता व्यक्त करीत आहोत. शासकीय खर्चाने चालणाऱ्या इतर काही विद्यापीठांमध्येही अशा प्रकारचे अभ्यासक्रम चालू असल्याची नोंद आम्ही घेतलेली आहे. ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ ची सर्व स्तरांवरील अभ्यासक्रमात ओळख करून दिली पाहिजे या नवीन शैक्षणिक धोरणातील (NEP 2020) शिफारसीचा आधार घेऊन या निर्णयाला केंद्रसरकार पुष्टी देत आहे.
खगोलशास्त्र, गणित, धातूशास्त्र, रसायनशास्त्र, आरोग्य आणि तत्त्वज्ञान यासह अनेक क्षेत्रांमध्ये ज्ञाननिर्मिती करण्याची समृद्ध परंपरा भारतात आहे. आधुनिक विज्ञानाच्या रोपाला विविध कालखंडांमध्ये विविध थोर संस्कृत्यांनी खतपाणी घातल्यामुळेच त्याचा वृक्ष बहरलेला आहे. या सामूहिक ज्ञानामध्ये भारताचे लक्षणीय योगदान आहे. विज्ञानाच्या परिपूर्ण शिक्षणात त्याचे निश्चितच महत्त्वपूर्ण स्थान असेल.
परंतु, प्राचीन दंतकथांचे दाखले देऊन, (उदा. प्राचीन भारतात विमानाचे तंत्रज्ञान होते), त्या काळात आपल्याकडे वैज्ञानिक आणि तंत्रवैज्ञानिक शोध (कपोलकल्पित) लागलेले होते असा दावा करणे, धडधडीतपणे छद्मविज्ञान असलेल्या फलज्योतिषासारख्या क्षेत्राला प्रोत्साहन देणे, यासारख्या गोष्टींमधून भारतीय विज्ञानाच्या खऱ्या इतिहासाची नाचक्कीच होते.
ज्यांचा फोलपणा सहज सिद्ध करता येतो अशा गोष्टी शिकण्यात वाया जाणारा आपल्या विद्यार्थ्यांचा वेळ खरे तर भारतीय विज्ञानाचा खराखुरा इतिहास शिकण्यासाठी वापरणे शक्य आहे. यातील सर्वात गमतीचा भाग म्हणजे फलज्योतिषातील भाकीते ही कल्पना आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये नसून ती परकीयांकडून आयात केलेली आहे. जन्मराशीवर आधारित कुंडली बनवून त्यावरून भविष्य सांगण्याची पद्धत प्राचीन भारतात नव्हती. या प्राचीन खास्दी आणि ग्रीक कल्पना इसवीसन पूर्व चौथ्या शतकानंतर भारतात आल्या याचे निर्विवाद पुरावे उपलब्ध आहेत.
नियंत्रित संख्याशास्त्रीय चाचणीत ज्योतिषी भाकीते दरवेळी हमखास नापास होतात. त्यामुळे ग्रहगोलांचा मानवी शरीरावर काही अर्थपूर्ण परिणाम होऊ शकतो यावर विश्वास ठेवण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. एकावेळी आकाशात असलेल्या ग्रहगोलांचा वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यावर त्यांच्या जन्मवेळेनुसार वेगवेगळा परिणाम होईल हे फलज्योतिषातले तत्त्व साध्या तर्कापुढेही टिकत नाही. असा अप्रमाणित आणि अतार्किक विषय IGNOU सारख्या विद्यापीठात अभ्यासक्रम म्हणून आणणे म्हणजे शासनाने अंधश्रद्धेला खतपाणी घालणे आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A(h) चे हे उल्लंघन आहे. या कलमानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरणे अनिवार्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार व प्रसार करणे हे भारतीय नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाचे घटनादत्त कर्तव्य आहे. त्यामुळे छद्मविज्ञानाला, विशेषतः शासनपुरस्कृत छद्मविज्ञानाला विरोध करणे हे देखील भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.
केंद्रसरकार आणि काही राज्यसरकारे कोरोनाबद्दलच्या खोट्या आणि फसव्या माहितीला, आकडेवारीला प्रोत्साहन देत आहेत, उचलून धरत आहेत आणि हे करणाऱ्यांची जाहिरातदेखील करत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक धोरणे आखणे व त्यानुसार प्रतिसाद ठरवणे याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत आम्ही चिंता व्यक्त करीत आहोत.
वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय कोरोनाचा सामना अशक्य आहे. खाजगी आरोग्य सेवांमध्ये कॉर्पोरेट नफेखोरीला वाव ठेवणारी धोरणे केंद्रशासनाबरोबरच अनेक राज्यांनी अवलंबलेली आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यसेवांकडे दुर्लक्ष होऊन त्या कमकुवत होत आहेत. ही धोरणे बदलणे आणि प्रभावी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वांसाठी उपलब्ध कऱणे हे कोरोनावर मात करण्यासाठी अत्यावश्यक आहे. सर्वांसाठी मोफत आणि गतिमान लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण ठरवून त्याची कार्यक्षम अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. प्रामाणिक डेटावर आधारित आखणी करणे त्यासाठी गरजेचे आहे.
मोफत लसीकरणाच्या जाहिरातींवर अमाप पैसा खर्च करणारे केंद्रशासन व काही राज्यसरकारे जमिनीवरील प्रश्नांबाबत मात्र सपशेल नापास झालेली आहेत. लशींचा पुरेसा पुरवठा त्यांना करता आलेला नाही. ऑक्सिजनची पुरेशी सोय करता आलेली नाही, इतकेच काय, तर कोव्हिडने मरण पावलेल्यांच्या प्रेतांची योग्य विल्हेवाट देखील लावता आलेली नाही. जमिनीवरील वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या प्रसारमाध्यमांना पद्धतशीरपणे लक्ष्य करून, यंत्रणेचा दुरूपयोग करून, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा रीतीने शासन स्वतःच खोट्या माहितीला आणि आकडेवारीला खतपाणी घालत आहे आणि सत्य दडपण्याचा सक्रिय प्रयत्न करीत आहे.
आम्ही, ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कचे सदस्य आणि देशप्रेमी नागरिक, अशी मागणी करतो की शासकीय खर्चाने चालणाऱ्या सर्व विद्यापीठांमधील फलज्योतिषाशी संबंधित अभ्यासक्रम बंद करण्यात यावेत, व त्याऐवजी भारतीय विद्यापीठांमध्ये खगोलशास्त्राचे अभ्यासक्रम सुरू करावेत. आरोग्य क्षेत्रातील कॉर्पोरेट खाजगीकरणाची धोरणे मागे घ्यावीत आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित धोरणे पुनर्स्थापित करावीत. दर्जेदार सार्वजनिक आरोग्य सेवा या सार्वत्रिक हक्क म्हणून मिळतील याची हमी दयावी.
कोव्हिडच्या वास्तव परिस्थितीचे प्रामाणिक कथन करणाऱ्या माध्यमांवर शासन करीत असलेले हल्ले त्यांनी थांबवावेत, आपल्या राज्यघटनेतील कलम 51A(h) चा संपूर्ण आदर ठेवून शासनाने व्यापक स्तरावर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करावा आणि कोव्हिडच्या महासाथीचा प्रभावी प्रतिकार करावा अशीही मागणी आम्ही करीत आहोत.
२० ऑगस्टला राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवसाच्या निमित्ताने वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कार्यक्रमात सर्व नागरिक, लोकसंघटना आणि शैक्षणिक संस्थांनी सहभागी व्हावे. तसेच, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या निर्घृण खूनाच्या विरोधात आपला आवाज उठवावा असे आम्ही आवाहन करतो.
कोरोनाचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. फलज्योतिषाचा प्रसार करण्याच्या सरकारी प्रयत्नांचा प्रतिकार करा.
Join Over 10,000 Students, Teachers & Parents Enjoying Maths
Become Part of NLF family.
Get Social